लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : परजिल्हा, परराज्यातून येणाऱ्या कोणत्याही नागरिकांची तपासणी आता सांगली जिल्ह्यात होत नाही. कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसऱ्या बाजूंनी बाहेरुन येणाऱ्या लोकांची तपासणी होत नसल्याने धोका वाढला आहे.
जिल्ह्यात मिरज, जत तालुक्यांना कर्नाटक सीमा लागते. या दोन्ही तालुक्यात कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. व्यापार व नातेसंबंधांमुळे सतत या दोन्ही तालुक्यात परराज्यातील लोकांची वर्दळ असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. दुसरीकडे अन्य तालुक्यांमध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. त्यांची तपासणी बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा जिल्ह्याच्या सीमांवर कुठेही केली जात नाही.
बसस्थानक
सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकातून अनेक बसेस सुरू आहेत. कर्नाटक, पुणे, मुंबईसह शेजारील सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर बसवाहतूक सुरू आहे. तरीही येथे कोणतीही तपासणी केली जात नाही. बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दीही होत आहे.
रेल्वेस्थानक
सांगली व मिरज रेल्वे स्थानकातून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू आहे. कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वगळता अन्य सर्व फेऱ्या सुरू आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची तपासणी प्रवाशांची होत नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्हा सीमा
मिरज व जत तालुक्यात जिल्ह्याला लागून कर्नाटकची सीमा आहे. यातील कोणत्याही गावात तपासणी केली जात नाही. कर्नाटकात याउलट स्थिती असून त्याठिकाणी तपासणी केली जात आहे. अन्य तालुक्यात परजिल्ह्याला जोडणाऱ्या सीमा रस्त्यांवर, नाक्यांवरही तपासणी होत नाही.