फोटो ओळ : जत येथे श्री स्वामी समर्थ ट्रस्टच्यावतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना खाद्यपदार्थांचे वाटप आमदार विक्रम सावंत, बापूसाहेब पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : कोरोनाच्या संकट काळात कोणी खचून जाऊ नये. धैर्याने या परिस्थितीला सामोरे जावे. या कठीण काळात काही सामाजिक संघटनांनी माणुसकी जपली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले.
आमदार सावंत यांनी विविध सामाजिक संघटनांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शहरातील कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना खाद्यपदार्थ व पाण्याचे वाटप केले. ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दीपक पाटणकर, अतुल मोरे, संतोष तोरणे आदींनी हा उपक्रमात सहभाग घेतला.
आमदार सावंत म्हणाले की, जत तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढ विचारात घेऊन सध्याच्या कोविड सेंटर शेजारील वसतिगृहात ५० बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्याचे काम गतीने सुरू केले आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व उपचार उपलब्ध होण्याबरोबरच ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना ही मदत करीत आहे. दररोज सकाळी ११ वाजता ही मदत कोविड सेंटरच्या बाहेर उपलब्ध असून नियमांचे पालन करून मदत स्वीकारावी, असे आवाहन बापूसाहेब पवार यांनी केले.