सांगली : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘चला एकत्र येऊया’ या कार्यक्रमाने बुधवारी सांगलीत गर्दीचा नवा विक्रम नोंदवित सांगलीकर रसिकांचे निखळ मनोरंजन केले. रसिकांचा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून गेले. ‘अशी गर्दी आम्ही परदेशातही पाहिली नाही’, अशी भावना व्यक्त करून त्यांनी सांगलीकरांच्या रसिकतेला दाद दिली.येथील तरुण भारत क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता सांगलीकरांमध्ये होती. त्यामुळे दुपारी दोनपासूनच क्रीडांगणावर गर्दी होऊ लागली. गर्दी आवाक्याबाहेर गेल्यामुळे तब्बल तीन तास कलाकारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जाता आले नाही. प्रदीर्घ प्रतीक्षेत आणि गर्दीतून वाट काढत कलाकारांनी स्टेज गाठले आणि मनोरंजनाची धमाल सुरू झाली. मूळ मिरजेतील गायक स्वप्नील गोडबोले आणि आरोही म्हात्रे यांनी अनेक गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘आशिकी २’ चित्रपटातील त्यांच्या गाण्यांसाठी प्रेक्षकांमधून वन्स मोअरची मागणी होत होती. त्यानंतर रश्मी कानिटकर आणि ग्रुपने विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांना ताल धरायला लावला.
प्रसिद्ध विनोदवीर भाऊ कदम, सागर कारंडे, भरत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांनी एकापेक्षा एक प्रहसन सादर करून सांगलीकरांना मनमुराद हसविले. हसावाहसवीचा हा खेळ रंगला असतानाच, त्यांनी प्रेक्षकांशीही संवाद साधला. प्रेक्षकांच्या प्रश्नांना त्यांनी तितक्याच मार्मिक पद्धतीने उत्तरेही दिली. सूत्रसंचालक-निवेदक नीलेश साबळे यांनीही संवादकौशल्याच्या जोरावर उपस्थितांची मने जिंकली. केवळ सांगली आणि ट्रस्टचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांच्या आग्रहाखातर हा प्रपंच केल्याचे साबळे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास दाद दिली.गायक आदर्श शिंदे याचे आगमन होताच रसिकांनी शिट्या, टाळ्यांचा कडकडाट केला. ‘आवाज वाढीव डीजे...’ या गाण्याने त्याने सुरुवात करताच गॅलरीत व खुर्च्यांवर उभे राहून तरुणांनी नाचायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाने रसिकांचे ‘फुल टू’ मनोरंजन केले.पोलिस आणि संयोजकांची कसरततरुण भारत क्रीडांगणावरील खुर्च्या, सर्व कक्ष आणि गॅलरी भरल्यानंतर मैदानात जागा मिळेल तिथे बसून प्रेक्षकांनी आनंद लुटला. स्टेडियमच्या चारही बाजूला गर्दी झाल्यामुळे संयोजक आणि पोलिसांची तारेवरची कसरत झाली. मात्र कोणताही अनुचित प्रकार न होता कार्यक्रम शांततेत पार पडला.सांगलीकरांचा सत्कारबालरंगभूमीच्या चळवळीचे प्रणेते श्रीनिवास शिंदगी, प्रसिद्ध निवेदक विजय कडणे, चित्रपट निर्माते सुनील फडतरे आणि अ ब क ड कल्चरल ग्रुपचे प्रमुख शरद मगदूम यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, चेतन चव्हाण, संयोजक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि इतर कलाकारांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
अशी गर्दी पाहिली नाहीउपस्थित कलाकारांनी स्टेजवर येताच सांगलीकरांसाठी हात जोडले. भाऊ कदम, सागर कारंडे म्हणाले की, देशात आणि विदेशातही आम्ही अनेक कार्यक्रम केले, मात्र अशी गर्दी आम्ही कोठेही पाहिली नाही. कारंडे म्हणाले की, प्रेक्षकांचे हे प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देत असते.गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर ‘चला एकत्र येऊया’ हा कार्यक्रम बुधवारी झाला. यावेळी विनोदवीर अभिनेता भरत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांनी एकापेक्षा एक प्रहसन सादर करून सांगलीकरांना मनमुराद हसविले. दुसºया छायाचित्रात या कार्यक्रमात रसिकांच्या गर्दीने नवा विक्रम नोंदविला.