‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

By घनशाम नवाथे | Published: April 5, 2024 01:13 PM2024-04-05T13:13:07+5:302024-04-05T13:13:59+5:30

'विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल'

Come with you if you come otherwise without you Sanjay Raut warning to Congress from Sangli seat | ‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

सांगली : राज्यात रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जागा आम्ही त्यांना दिल्या. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी राष्ट्रीय विचार करावा. हिंदकेसरीने गल्लीतील कुस्ती खेळू नये. सांगलीच्या जागेचा तिढा कशासाठी निर्माण केला जातोय. चंद्रहार यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, असा विचार करावा लागेल. कारण शिवसेनेचे हे ५५ वर्षांचे धोरण आहे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

सांगलीत विश्रामबाग येथील हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सांगलीच्या जागेवरून नाराजी वाटत नाही. देशात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. सांगलीच्या जागेबाबत वादाचा विषयच नाही. सांगलीची जागा ही कोणत्या पक्षाची नसून महाविकास आघाडीची आहे. या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलो तर केंद्रात काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी मदत होईल. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान हवा असेल तर त्यासाठी सांगलीतील खासदार निवडून द्यावा. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विचार करावा. सांगलीच्या जागेसाठी अडून बसणे म्हणजे हिंदकेसरीने गल्लीतील कुस्ती खेळण्यासारखे आहे. त्यांनी त्या उंचीवरच बोलले पाहिजे.

खासदार राऊत पुढे म्हणाले, भिवंडीत आम्ही राष्ट्रवादीला मदत केली. तसेच काँग्रेसने सांगलीत मदत केली पाहिजे. सांगलीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बाेललो आहे. राज्यात रामटेक, कोल्हापूर आणि अमरावतीची जागा दिल्यानंतर सांगलीचा तिढा कशासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. सांगलीत चंद्रहार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चंद्रहार पाटील यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. ‘आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय’ असा निर्णय घ्यावा लागेल. कारण ५५ वर्षांचे हे शिवसेनेचे नव्हे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण आहे. सांगलीची जागा शंभर टक्के जिंकली जाईल.

यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील, दिगंबर जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजीत पाटील, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.

विशाल यांना संसदेत पाठवू

खासदार राऊत शुक्रवारी सकाळी कवलापूर विमानतळाच्या जागेवर हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. तेव्हा सांगलीच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, विशाल पाटील यांच्याबाबत आम्हाला आस्था, प्रेम आहे. विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची जबाबदारी आमची राहील.

Web Title: Come with you if you come otherwise without you Sanjay Raut warning to Congress from Sangli seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.