हरिपूर येथे कृष्णेकाठी बांबूलागवड करण्यात आली. यावेळी अरविंद तांबवेकर, राजेंद्र घुणकीकर, शीतल मांगले, सलील लिमये आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘माझी माय कृष्णा’ लोकचळवळीअंतर्गत कृष्णा नदीकाठी बांबूलागवडीला प्रारंभ करण्यात आला. हरिपूर येथे अरविंद तांबवेकर, परिमंडल वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनरक्षक शीतल मांगले, ‘माझी माय कृष्णा’ चळवळीचे समन्वयक सलील लिमये, सतीश खंडागळे, आकाराम कारंडे, मुख्याध्यापक दिलीप पवार यांच्या हस्ते बांबूलागवड करण्यात आली.
बांबूलागवडीची चळवळ लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. मळीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच अन्य समाजघटकांनीही चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन लिमये यांनी यावेळी केले.
घुणकीकर म्हणाले की, ‘पुस्तकातील पर्यावरण विषय मस्तकात गेला पाहिजे. आपण सर्वांनी निसर्गाशी मैत्री करायला हवी.
स्वागत मुख्याध्यापक पवार यांनी केले. प्रास्ताविक विठ्ठल मोहिते यांनी केले. आभार राजाराम वावरे यांनी मानले. यावेळी सुवर्णा गायकवाड, राजकुमार हेरले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कोंडाबाई साळुंखे हायस्कूल, राष्ट्रीय हरित सेना व हरिपूर ग्रामपंचायतीने केले.