इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाची सुरुवात येथील उपजिल्हा रुग्णालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कोव्हिशिल्डची पहिली लस टोचून घेण्याचा मान आरोग्य कर्मचारी गोरखनाथ चंदनशिवे यांना मिळाला.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची उपस्थिती होती.
जयंत पाटील यांनी रुग्णालयात लसीकरणासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. डॉ. साळुंखे आणि डॉ. पोरे यांच्याकडून लसीबद्दल माहिती घेतली, तसेच ही लस टोचून घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. लस टोचून घेणाऱ्या चंदनशिवे आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचा कोणताही त्रास होत नाही. कोरोनामुक्त जीवनासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. विक्रम कदम, प्रांत नागेश पाटील, डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी उपस्थित होते.
फोटो-