कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील मातंग समाज ते आंबेडकरनगर या गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. यानंतर तत्काळ या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात झाली आहे.
मात्र स्टेडियमच्या बाजूने शिवगणेश मंदिराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणांमुळे फारच अरुंद झाल्याने स्टेडियमच्या १५ ते २० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या दगडी भिंती कमकुवत झाल्या आहेत. या रस्त्यावरुन शाळकरी मुले ये-जा करतात. भिंतीजवळच लहान मुलांची अंगणवाडीही आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ती उतरवून रस्ता रुंदीकरण करावा व मगच डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
मांतग समाज ते आंबेडकरनगर या रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा जाधव यांनी पाठपुरावा केला होता. तर याबाबत ग्रामस्थांच्यावतीने रमेश पाटील यांनीही निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर या रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या जाधव यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद फंडातून व दलित वस्ती सुधार योजना या माध्यमातून निधी उपलब्ध झाला.