सांगली : महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या बदलीसाठी सोमवारी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांच्या कारभाराबद्दल मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीही आयुक्तांच्या बदलीला हिरवा कंदील दाखविला असून, मंगळवारी आदेश निघतील, असा दावा पदाधिकाºयांनी केला.
आयुक्त खेबूडकर यांच्याबद्दल सत्ताधारी भाजपचे नेते, पदाधिकारी व नगरसेवकांत मोठी नाराजी आहे. त्यातच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकालही संपला आहे. काही दिवसांपूर्वी खेबूडकर यांच्या मुदतवाढीची चर्चाही महापालिका वर्तुळात सुरू होती. गेल्याच आठवड्यात आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे महापौरांसह पदाधिकारी, नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर खुद्द गाडगीळ यांनी महापालिकेत बैठक घेऊन नगरसेवकांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या. सोमवारी मंत्री खाडे, आ. गाडगीळ यांच्यासह आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक शेखर इनामदार, गजानन मगदूम, आनंदा देवमाने, नगरसेविका भारती दिगडे, सुरेश आवटी आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन, आयुक्तांच्या बदलीसाठी साकडे घातले.
यावेळी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. आयुक्तांकडून कामांची अडवणूक करून विकासाला खीळ घातली जात आहे. जनतेने विकासासाठी भाजपच्या हाती सत्ता दिली होती. पण दहा महिन्यात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. या साºयाला खेबूडकर यांचा कारभार जबाबदार आहे. भाजपच्या नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. वादग्रस्त नगरोत्थान योजना, ड्रेनेज योजनेची बिले काढण्यास महासभेने मनाई केल्यानंतरही बिले दिली जात आहेत. शहरातील डी. पी. रस्ते करणे, अतिक्रमणे हटविणे, पाणी पुरवठा नियोजन, आरोग्य विभागाला शिस्त लावणे या कोणत्याही कामावर त्यांनी लक्ष दिलेले नाही. अशा कारभारामुळे महापालिकेत सर्वच विभागात अनागोंदी कारभार सुरू असून, शहराचे वाटोळे केले आहे, असा आरोपही करण्यात आला.
गटनेते बावडेकर म्हणाले, नगरोत्थान योजनेतून महापालिकेला शंभर कोटीचा निधी मंजूर झाला. त्याची निविदा प्रक्रिया खेबूडकर यांनी लांबविली. आता विधानसभा निवडणूक आचारसंहितेत अडकतील. त्यामुळे त्यांना हटवून विकासाला गती देणे गरजेचे आहे.
भारती दिगडे म्हणाल्या, आयुक्तांकडून अधिकाºयांच्या बैठकीचा फार्स केला जात आहे. त्यातून कोणत्याही कामांची निर्गती होत नाही. उलट अधिकाºयांना नगरसेवकांची कामे करू नका, असे सांगितले जाते, अशी तक्रार त्यांनी केली. मंत्री खाडे आणि आमदार गाडगीळ यांनीही पदाधिकाºयांच्या तक्रारीला दुजोरा दिला. खेबूडकर यांचा तीन वर्षाचा कार्यकाल संपला असून त्यांची बदली करून सक्षम आयुक्त द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी बदलीचा शेरा मारून पत्र नगरविकास सचिवांना पाठविले. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून नगरविकास सचिवांना खेबूडकर यांच्या बदलीचे आदेश काढण्याची सूचनाही केली आहे. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होईल, असे बावडेकर यांनी सांगितले.नितीन कापडणीस : यांना पसंतीमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी महापालिकेसाठी सक्षम व अनुभवी आयुक्त देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. नव्या आयुक्त पदासाठी नागपूरचे उपायुक्त नितीन कापडणीस व नगरचे उपायुक्त सुनील पवार यांच्या नावाला पदाधिकाºयांनी पसंती दिली. तसेच पुणे महापालिकेतील दोन उपायुक्तांचीही नावे सुचविण्यात आली आहेत. कापडणीस व पवार या दोघांनीही महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांना शहराचे चांगले ज्ञान आहे. ते विकास कामाला गती देतील, असा विश्वासही पदाधिकाºयांनी व्यक्त केला. दरम्यान, नितीन कापडणीस यांच्या नावाला अधिक पसंती असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे गटनेते युवराज बावडेकर यांनी सांगितले.