कुपवाड : महापालिकेत समाविष्ट असूनही अद्यापपर्यंत अविकसित अवस्थेत असलेल्या कुपवाड शहरासह उपनगरांना एक महिन्याच्या आत नागरी सुविधा देण्यास सुरुवात न केल्यास आयुक्तांवर फौजदारी दाखल करणार असल्याचा ठराव सुधार समितीतर्फे शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रति एरिया सभेत करण्यात आला. याबरोबरच एरिया सभा सुरू करण्यासाठी आयुक्तांना पत्रे पाठविण्याचाही निर्णय यावेळी घेतला. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने येथील देशभक्त आर. पी. पाटील चौकात प्रती एरिया सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेस जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, आर्किटेक्चर रवींद्र चव्हाण, कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल कवठेकर, माजी अध्यक्ष विजय खोत, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब लवटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अॅड. शिंदे म्हणाले की, सांगली, मिरजेच्या मानाने अविकसित असलेल्या कुपवाड शहरात सुविधांची वानवा आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्यामुळे शहर बकाल झाले आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नगरसेवक निधी नाही म्हणून नागरिकांना सांगतात. तसेच निधीचे कारण सांगून सुविधा देण्याचे टाळतात. परंतु, निधी नसूनही यांचे बंगले कसे काय सुधारत आहेत. भूखंड हाणणे आणि टक्केवारीवर ताव मारण्याचे काम त्यांना जमते. याबरोबरच व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर, विजय खोत, रवींद्र चव्हाण यांनीही महापालिका प्रशासनावर जोरदार प्रहार केला. कुपवाडला विकासापासून वंचित ठेवण्याच्या महापालिकेच्या धोरणावर त्यांनी टीका केली. तसेच अरुण रूपनर, गुंठेवारीचे नेते अजय माने, नरसगोंडा पाटील, मनीषा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी सुविधा न दिल्यास कुपवाडची ग्रामपंचायत करा. उपायुक्त व आयुक्तांना शहर बंदी करणार. तसेच कर न भरता त्यातून विकास कामे करण्याविषयीचे ठरावही नागरिकांच्यावतीने करण्यात आले. सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश व्हनकडे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील, बाबासाहेब चिंचवाडे, सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे, मुनीर मुल्ला, धनंजय भिसे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सुविधांसाठी आयुक्तांवर फौजदारी!
By admin | Published: July 19, 2015 12:40 AM