सांगली : आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका गार्डन द्या, आम्ही कोठे खेळायचे? असे म्हणत शामरावनगरमधील शाळकरी मुलांनी सांगली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. या परिसरात दोन कोटी रुपये खर्चाचे उद्यान मंजूर होते. पण हा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ मुलांनी आंदोलन करून नव्या उद्यानासाठी साकडे घातले.
शामरावनगरमधील आॅक्सिडेशन प्लॉटच्या दहा ते बारा एकर जागेत उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी या जागेची पाहणी करून उद्यान विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. पण ऐनवेळी या उद्यानाचा निधी अन्यत्र वळविण्यात आला. आता या दोन कोटीच्या निधीतून महापालिका क्षेत्रात १३ नवीन उद्याने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
वास्तविक शामरावनगर परिसरात एकही उद्यान आहे. या भागात जवळपास ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. त्यात शामरावनगर, हनुमाननगर या भागात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज समस्या अशा मुलभूत सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात तर नागरिकांना चिखलातून जावे लागते. त्यात उद्यानाचा मंजूर निधीही पळविल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
त्यासाठी शाळकरी मुलांनीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर अनोखे आंदोलन करून प्रशासन व नगरसेवकांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या प्रवेशद्वारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारून मुलांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर दळवी यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी आयुक्त खेबूडकर यांना निवेदनही दिले.
वेगवेगळी वेशभूषाशामरावनगर परिसरातील शाळकरी मुलांनी आंदोलनावेळी वेगवेगळी वेषभूषाही केली होती. प्राणी, पक्षी, फुलांची वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. आयुक्त काका गार्डन द्या, नगरसेवक काका, नगरसेविका काका गार्डन द्या, आम्ही कोठू खेळू? आमची काय चूक? असे फलकही मुलांनी फडकवित उद्यानासाठी साकडे घातले.