सांगली : शहरातील काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. हा कचरा बाहेर काढून खणीच्या स्वच्छतेसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेतला आहे. अग्निशमन विभागाकडील बोटीला लोखंडी बकेट बसवून त्याद्वारे खणीतील कचरा गोळा केला जाणार आहे. गुरुवारी त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आता दररोज दोन तास बोटीद्वारे खणीची स्वच्छता केली जाणार आहे.
आयुक्त कापडणीस यांनी काळी खण सुशोभिकरणाचा निर्धार केला आहे. सध्या काळ्या खणीत कचरा, प्लॅस्टिक साहित्य मोठ्या प्रमाणात पाण्यावर तरंगत आहे. खणीत उतरून त्याची स्वच्छता करणे अशक्य असल्याने आयुक्तांनी जाळी असणारे बकेट तयार करण्याची सूचना केली होती. हे बकेट अग्निशामक विभागाच्या बोटीवर बसवण्यात आले असून, बकेटद्वारे कचरा गोळा करण्याचे प्रात्यक्षिक गुरुवारी पार पडले. बोटीच्या एका फेरीत जवळपास अर्धा टन कचरा जमा झाला.
या देशी बनावटीच्या बकेटची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी केली. यावेळी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, मुकादम शिंगे उपस्थित होते.