ओळी : इंग्लंडमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीमधील 'पब्लिक स्पिकिंग क्लब'च्या माध्यमातून एमबीएच्या विद्यार्थ्यांशी झुम कॉलद्वारे प्रतीक पाटील यांनी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य असायला हवे. अभ्यास व सरावातून तुम्ही तुमचे संवाद कौशल्य अधिक परिपूर्ण, प्रभावी करू शकता, असा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
जगातील एक अग्रगण्य विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांशी झुम कॉलद्वारे त्यांनी संवाद साधला. केंब्रिजमध्ये एमबीए विभागाचा पब्लिक स्पिकिंग क्लब आहे. या क्लबमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून समाजाच्या विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जाते. या क्लबमध्ये एमबीएच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रतीक पाटील यांना निमंत्रित केले होते.
ते म्हणाले, मी माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करू लागलो. मला जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात प्रथम बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा मी इतके प्रभावी बोलू शकलो नाही. मात्र, त्यानंतर मी अभ्यास केला, सराव केला. आजही मी फार मोठा वक्ता आहे, असे नाही. मात्र मी सुधारणा करीत पुढे जात आहे, याचे मला समाधान आहे. जन्मतः कोणी परिपूर्ण नसतो. तुम्ही सराव व अभ्यासातून परिपक्वता वाढवू शकता. तुम्ही जगातील प्रभावी व्यक्ती व वक्त्यांच्या वक्तृत्व शैलीचा अभ्यास करून त्यांची शैली आत्मसात करू शकता. ते एखादा मुद्दा कशा पद्धतीने मांडून समाजाला प्रभावित करतात, याचा अभ्यास करायला हवा. यातून तुमचे संवाद कौशल्य अधिक प्रभावी होऊ शकते. तुम्ही शेतकरी, व्यापारी, आदी कोणत्या घटकांशी संवाद करणार आहात? त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊन बोला. तुमचा संवाद निश्चितपणे प्रभावी होऊ शकतो.
पाटील म्हणाले, मुलाखत हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. बऱ्याच वेळा हुशार विद्यार्थीही मुलाखत प्रभावी न झाल्याने अपयशी ठरतो. विद्यार्थ्यांनी मुलाखतीस जाताना, आपण मुलाखत देत असलेली कंपनी, कंपनीचे उत्पादन, त्यांची वैशिष्ट्ये, कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी, आदी सविस्तर माहिती घेऊन मुलाखत द्यायला हवी. आपण निश्चितपणे यशस्वी व्हाल.