इस्लामपूर : राष्ट्रवादीच्यावतीने कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसलेल्या शहरातील गरीब, गरजू कुटुंबांसाठी बुधवार दि. १५ पासून मोठ्या थाटात ह्यकम्युनिटी किचनह्ण सुरू केले आहे. परंतु येथील सोशल डिस्टन्सिंग नियमाबाबत कोणीही गांभीर्य न दाखविल्याने येथे अन्न मिळविण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.
इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील ख्रिश्चन बंगला परिसरात हे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. तेथे मंडप घालण्यात आला आहे. तसेच इस्लामपूर-बहे रस्त्यावर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या परिसरातही या जेवणाचे वाटप गरजूंना केले जात आहे. परंतु हे अन्न वाटप करताना कोरोना संसर्गासाठी महत्त्वाचा असणारा सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे. हे किचन सुरू करताना मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. परंतु यानंतर येथील व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्यानेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.कम्युनिटी किचन परिसरात नागरिकांकडून सुरक्षित अंतराची मर्यादा राखण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे.