उमदी : उमदी (ता. जत) येथील उमदी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ३० जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि. २१ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक महादेवप्पा होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली..दुष्काळी भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९८९ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज दोन कोटी पाच लाख भागभांडवलापर्यंत या संस्थेची मजल गेली आहे. संस्थेकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये लेक वाचवा योजना, एलआयसी ग्रुप विमा, राष्ट्रीय आपत्ती निधी, मृत व्यक्ती सभासदांना मदत अशा योजनेतून समाजातील गरीब, पीडित नागरिकांना मदतीचा हातभार लावत असते. सद्य:स्थितीत दुष्काळ, महागाईमध्ये लग्न करणे कठीण झाले आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या परिसरातील तीस जोडप्यांना मणी मंगळसूत्र, संसार सेट, भांडी, कपडे असा प्रतीजोडी ३० ते ४० हजार रुपये खर्च ही संस्था करणार आहे. अशा एकूण ३० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा २१ जानेवारीरोजी उमदी येथे आयोजित करण्यात आला आहे.रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी ‘कायद्यातील बदल’ या विषयावर चर्चासत्र, दि. २२ रोजी द्राक्ष, डाळिंब तसेच पाणी नियोजन चर्चासत्राचे आयोजन केल्याची माहिती होर्तीकर यांनी दिली. अध्यक्षा शारदा धोत्री, सचिव अरविंद सौदी, सचिन होर्तीकर उपस्थित होते. (वार्ताहर)
उमदी ग्रामीण पतसंस्थेतर्फे ३० जोडप्यांचा सामुदायिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 11:17 PM