२) इस्लामपूर येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरोजमाई पाटील, रवींद्र पवार, एन. आर. पाटील, प्रा. अजितकुमार पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत त्या त्या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन प्रत्येक जिल्ह्यात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे नियामक मंडळ सदस्य ॲड. रवींद्र पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरोजमाई पाटील, एन. आर. पाटील, प्रा. डॉ. मोहन राजमाने, दिलीप पाटील, संगीता पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी डोक्यात वेड घ्यावे लागते, तसे अथक परिश्रमही करावे लागतात. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना प्रत्येक नागरिकाला चांगली सेवा द्या.
प्रबोधिनीचे संचालक प्रा. अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात १६ वर्षांत सामान्य कुटुंबातील ७७२ मुले अधिकारी बनल्याचे सांगितले. प्रा. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
मॉरल बुस्ट द्या..!
धनंजय मुंडे यांना भाषणापूर्वी संयोजकांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा निर्माण होईल, असे ‘मॉरल बुस्ट’ द्या, अशी विनंती केली. त्याचा संदर्भ घेत मुंडे म्हणाले, मला शिक्षणातील ‘मॉरल बुस्ट’ देता येईल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात मते मिळवताना मात्र ‘मॉरल बुस्ट’ देणारे भाषण करतो.