मिरज : मिरजेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या युसूफ हाजीफरीद बाणदार (वय ७०) या वृध्दाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तक्रारीबाबत चौकशी सुरू असतानाच बाणदार पोलीस ठाण्यातच निपचित पडल्याने पोलिसांची धावपळ उडाली. मिरजेतील समतानगर येथे लक्ष्मीनगर परिसरात युसूफ बाणदार यांचे शेत आहे. त्यांच्या शेजारी असलेले शेतकरी महादेव बन्ने हे बाणदार यांच्या मका पिकातून ये-जा करून पिकाची नासधूस करीत असल्याची त्यांची तक्रार होती. शुक्रवारी बाणदार यांनी याबाबत तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी बन्ने व बाणदार हे दोघेही वृध्द असून, त्यांना पोलिसांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले होते. आज दुपारी तीन वाजता ठाणे अंमलदार सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी वाघमोडे यांच्यासमोर बाणदार व बन्ने यांच्यातील रस्त्याच्या वादाबाबत चौकशी सुरू असताना अचानक युसूफ बाणदार यांना अस्वस्थ वाटू लागले. ते ठाणे अंमलदारांसमोरच खाली कोसळल्याने पोलिसांनी मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तत्पूर्वीच बाणदार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाणदार यांच्या मृत्यूमुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन माहिती घेतली. (प्रतिनिधी)
तक्रारदाराचा पोलीस ठाण्यात हृदयविकाराने मृत्यू
By admin | Published: January 18, 2015 12:23 AM