लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील तरुण भारत स्टेडियम ते विष्णुदास भावे नाट्यगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावरच ड्रेनेज चेंबरचे झाकण गायब झाल्याने अपघात होत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी तक्रारी नोंदविल्या.
सामाजिक कार्यकर्ते शरद फडके व नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याबाबत तक्रार केली. सोशल मीडियावरही याची छायाचित्रे टाकल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला. वळणावरच हा खड्डा असल्याने त्यात वाहने पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. या मार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. साखळकर यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ड्रेनेज चेंबरचे झाकण गेली १५ ते २० दिवस झाले गायब आहे. हे झाकण एक तर चोरीस गेले असावे किंवा ते काढून टाकले असावे. हे वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तरी तात्काळ चोरी होणार नाही, अशा पद्धतीने झाकण बसवण्यात यावे.