सांगली : महापालिकेच्या कोल्हापूर रस्त्यावरील मलनिस्सारण केंद्रात सफाईचे काम करताना अभियंत्यासह दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने ठाण्यातील मे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे श्रीकांत शंकर बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण, या घटनेला २४ तास होऊन गेले तरी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही.कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा कुस्ती आखाड्याजवळ पालिकेच्या ड्रेनेज योजनेंतर्गत मलनिस्सारण केंद्र आहे. शनिवारी दुपारी या योजनेच्या प्रकल्पातील पंचवीस ते तीस फूट इंटकवेलची (विहिरीची) स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी विठ्ठल शेरेकर यांनी झाकण उघडले, त्यावेळी आतून विषारी वायू बाहेर पडल्याने शेरेकर बेशुद्ध होऊन विहिरीत पडले. हा प्रकार पाहून उमाकांत देशपांडे त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. पण एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही गुदमरुन मृत्यू झाला, तर दोन कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले होते. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी, याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी रविवारी शहर पोलिसांत ठाण्याच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे ठेकेदार श्रीकांत बुटालासह महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार दिली आहे.तक्रारीत म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भुयारी गटारीसह अन्य कामे करण्याचा ठेका एसएमसी कंपनीला दिला आहे. यासंदर्भात पालिकेने या कंपनीशी करारही केला आहे. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक सेवा सल्लागार म्हणून महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती केली आहे. मलनिस्सारण केंद्रात कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून कामावर देखरेख न झाल्याने उमाकांत देशपांडे व विठ्ठल शेरेकर यांचा बळी गेला आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ !मलनिस्सारण केंद्रात दोघांचा बळी गेला. पालिकेने फिर्याद देऊनही शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रविवारी दिवसभरात पूर्ण केली नाही. पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ठाणे अंमलदारांनी, अजून गुन्हा दाखल नाही, असे सांगितले. तसेच अधिकाºयांनी कोणते कलम लावायचे, हे पाहून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
ठेकेदार, कार्यकारी अभियंत्याविरुद्ध तक्रार; गुन्हाच दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:16 AM