आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील ५२ एकर शेतजमीन पूर्वी ठरलेल्या खरेदीदाराशिवाय दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याप्रकरणी आष्टा येथील कृष्णराव शिवाजीराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांवर आष्टा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही जमीन आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे व इतर पाचजणांनी खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, रोहित भरत निलाखे (वय २८, रा. वखारभाग, सांगली) यांनी एक कोटी १९ लाख सात हजारांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंदवाडी (ता. वाळवा) परिसरात कृष्णराव शिवाजीराव थोरात (सरकार) यांच्या पत्नी अनुराधा, मुले पृथ्वीराज व ऋतुराज यांच्या नावे ही जमीन आहे. या जमिनीबाबत २०१२ मध्ये रोहित निलाखे यांच्याशी प्रति एकर दोन लाख तीन हजार याप्रमाणे थोरात यांचा व्यवहार ठरला होता. या जमिनीची एकूण रक्कम एक कोटी १९ लाख सात हजार अशी ठरली होती. यापैकी करारावेळी थोरात यांना निलाखे यांनी वेळोवेळी ७९ लाख ४९ हजार १७० रुपये दिले होते. उर्वरित रक्कम, जमिनीसंदर्भातील सर्व शासकीय परवाने घेऊन जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्याचे ठरले होते, असे असतानाही कृष्णराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांनी या जमिनीचा व्यवहार रोहित निलाखे यांच्याशी पूर्ण न करता, त्यांना कोणतीही कल्पना न देता ही जमीन नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे (रा. आष्टा), अशोक रामचंद्र पाटील (रा. नेर्ले), सुनील ज्ञानदेव पाटील (रा. भडकंबे), शशिकांत शंकर सोकाशी (रा. बागणी), प्रशांत उत्तुरे, कविता उत्तुरे (दोघे रा. मिरज) यांना ३१ डिसेंबर २०१५ ला परस्पर विकली. याबाबत रोहित निलाखे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये कृष्णराव शिवाजीराव थोरात व त्यांच्या कुटुंबीयांवर भा.दं.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)नगराध्यक्षा शिंदेंसह पाचजणांना दुसऱ्यांदा विक्रीथोरात यांनी निलाखे यांच्याकडून अॅडव्हान्स रकमा घेऊनही आष्ट्याच्या नगराध्यक्षा मंगला विलासराव शिंदे यांच्यासह पाचजणांना ही जमीन विकली आहे. त्यांचीही या प्रकरणात फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
आष्ट्यात जमीन विक्रीत कोटीची फसवणूक चौघाजणांविरुद्ध पोलिसांत तक्रार
By admin | Published: January 08, 2016 1:32 AM