सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेच्या तिस-या दिवशी शनिवारीही वादावादी झाली. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले आणि महापालिकेच्या अधिका-यांमध्ये कारवाईवरून पुष्पराज चौकात जोरदार वादावादी झाली. अखेर पोलिसांनी येऊन वाद मिटविला. महापालिका अधिका-यांनी याप्रश्नी टेंगले यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेने सांगलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे. कारवाईच्या पहिल्याचदिवशी मारुती चौकात नगरसेवक बाळासाहेब गोंधळी व नगरसेविका पती हेमंत खंडागळे यांनी अधिकाºयांशी वाद घातला होता. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गोंधळी यांना नोटीस बजावली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. शनिवारी येथील हरभट रोड, बालाजी चौक, दत्त मारुती रोडवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर व्यवसाय करणारे हातगाडीवाले, विक्रत्यांना शिस्त लावत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.दुपारच्या टप्प्यात सिव्हिल हॉस्पिटलसमोरील गारपीरकडे जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. येथील फळ विक्रते, हातगाडीवाले, चहाच्या टपºया आदी अशी सुमारे २० ते २५ अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी किरकोळ विरोध झाला. कर्मवीर चौकातील पाच हातगाडीवाल्यांवर कारवाई सुरु होताच विक्रेत्यांनी जोरदार विरोध केला. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले घटनास्थळी आले. त्यांनीही पालिकेचे अतिक्रमणविरोधी पक्षकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्याशी वाद घातला. न सांगता कारवाई कशी केली? आधी फेरीवाला धोरण राबवा, मगच कारवाई करा, अशी मागणी करत टेंगले यांनी पालिकेने जप्त केलेले हातगाडे परत घेतले. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. अधिकाºयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर टेंगले यांच्याविरोधात घोरपडे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
सांगलीत अतिक्रमणे हटविताना अधिकारी-विक्रेत्यांत वादावादी : फेरीवाला संघटनेच्या अध्यक्षांविरुद्ध तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:43 PM