सांगली : महापालिकेत बीओटी व कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला स्वाभिमानी आघाडीचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री, नगरविकास सचिवांकडे तक्रार केली असून, येत्या पंधरा दिवसांत स्वाभिमानीच्या नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार असल्याची माहिती नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी दिली. पवार म्हणाले की, बीओटीचे धोरण व कर्ज उभारणीची माहिती महासभा व जनतेसमोर ठेवल्याशिवाय राबवू नये, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस, सचिव नितीन करीर, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. तर करीर यांनी शासनाची परवानगी व महासभेच्या मान्यतेविना महापालिकेला प्रक्रिया राबविता येणार नाही. मान्यतेविना प्रस्ताव आल्यास ते फेटाळून लावण्याची हमी दिली. पुढील बैठकीत आम्ही कर्ज उभारणीची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवून देणार आहोत. कर्जाचा बोजा नागरिकांच्या डोक्यावर बसविण्याचा आयुक्तांचा डाव हाणून पाडू, असेही त्यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीच्या सत्तेचा सांगलीसाठी जास्तीत-जास्त फायदा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाजपमधील मंत्र्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. आतापर्यंत अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना सांगली दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. सिव्हिलप्रश्नी आरोग्यमंत्री दिलीप सावंत यांचा दौरा आयोजित करणार आहोत. पण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यशैलीबद्दल शंका असल्याचा ते म्हणाले. रिक्षा संघटनेच्या परवान्याची अडचण होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात चर्चा झाली होती. रावते यांनी रिक्षाचालकांना लोकसेवकांचा दर्जा देऊन रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्यादृष्टीने पावले उचचली आहेत. परवान्याचे सुलभीकरण केल्याने पाच लाख रिक्षाचालकांना लाभ मिळणार आहे. वर्षभरात कल्याणकारी मंडळही अस्तित्वात येईल. राज्यातील सत्तेचा कामासाठी कसा उपयोग करायचा, हे लोकप्रतिनिधींनी जाणून घ्यावे, असा टोलाही पवार यांनी आ. सुधीर गाडगीळ यांना लगाविला. (प्रतिनिधी)‘‘आयत्या पिठावर...’’कृष्णा नदीत मगरीची दहशत आहे. तिथे बोटिंगचे उद्घाटन होते. भविष्यात शामरावनगरच्या चिखलात मड थेरपीचा प्रकल्प उभारला जाईल. आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा कारभार भाजप प्रतिनिधींचा सुरू असल्याची टीका पवार यांनी केली.
बीओटीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By admin | Published: June 16, 2015 11:03 PM