सांगली : जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरणकडे गेल्या तीन महिन्यात ९ हजार ७९८ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या ४ हजार ८२२ तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडे आलेल्या तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारींची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडविल्या आहेत.ग्राहक समाधानास प्राधान्य देऊन महावितरणने ग्राहकांना घरबसल्या वीज सेवेबाबत ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यासाठी संकेतस्थळ, मोबाइल ॲप, टोल फ्री क्रमांक, ई-मेल, एसएमएस, ऊर्जा चॅटबॉट, मिस्ड कॉल सेवा असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय नजीकच्या शाखा, उपविभाग कार्यालयात भेट देऊन ग्राहक तक्रार दाखल करू शकतात.सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाद्वारे महावितरणकडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व इतर वीज सेवा-सुविधेबाबतच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्याच्या ४ हजार ८२२, वीज देयक विषयक ४ हजार ५३५ व वीज सुविधेबाबतच्या ४४१ अशा एकूण ९ हजार ७९८ दाखल तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांनी तक्रारी व माहितीसाठी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टल, महावितरण मोबाइल ॲप, सेवेतील टोल फ्री क्रमांक, ऊर्जा चॅटबॉट, ई-मेल आयडी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
ग्राहकांना तत्काळ सुविधा : धर्मराज पेठकरग्राहकांना मूलभूत सुविधा तात्काळ देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्राधान्य आहे. त्यानुसार आम्ही २४ तास कार्यरत आहे. वीज ग्राहकांच्या एकाही तक्रारीकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. म्हणून मागील तीन महिन्यात आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्के वीज ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक केली आहे, अशी माहिती महावितरणच्या सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.