सांगली : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आली होती. त्यामुळे बँकेच्या शाखेची चौकशी सुरु आहे. अशातच अन्य काही ग्राहकांनीही त्यांच्या दागिन्यांच्या वजनात घट झाल्याची तक्रार बँकेकडे नोंदविली आहे.
एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर व त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कवठेएकंद परिसरातील सोने तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी बँकेकडे धाव घेतली. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कवठेएकंद, तासगाव तसेच सांगली शाखेकडे केली. बँकेचे कर्मचारी, सराफ यांच्या समक्ष दागिन्याच्या वजनाची तपासणी केल्यामुळे ही बाब समोर आली. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांना चौकशीकरिता कवठेएकंद शाखेत पाठविण्यात आले. याठिकाणी त्यांनी दिवसभर चौकशी केली. सराफाशी चर्चाही केली. चौकशी सुरु असतानाच आता बुधवारी पुन्हा काही ग्राहकांनी अशाच स्वरुपाच्या तक्रारी शाखेकडे केल्या. रीतसर लेखी तक्रार करण्याची तयारी संबंधित ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे तक्रारी वाढून बँकेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.