सांगली : थकीत अबकारी करापोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून ३ कोटी ३० लाखांची पोती चोरीस गेल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. तपासात या साखरेची चोरी झाली नसून, ती कारखान्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाने साखर सापडली असल्याचे लेखी पत्र संजयनगर पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी अजून याची पडताळणी केलेली नाही. येत्या दोन-चार दिवसांत चोरीची दाखल झालेली फिर्याद व सापडलेली साखर याची खातरजमा केली जाईल, त्यानंतर साखरेची ही पोती जप्त केली जातील, असे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले. अबकारी कराची थकबाकी वसूल न झाल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर २०१५ मध्ये कारखान्याची दोन गोदामे सील केली होती. नोव्हेंबर २०१५ पासूनच्या अबकारी कराच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली होती. जुन्या थकबाकीपोटीही साखर जप्त केली होती. त्याचे पैसे भरल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली होती. अशा परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामांची पाहणी केल्यानंतर, त्यांना या ठिकाणाहून ३२ हजार ९४० पोती साखर गायब झाल्याचे लक्षात आले होते. साखरेच्या पोत्यांची चोरी झाल्याचा संशय बळावल्याने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक कमलाकर गुटे-पाटील, मुख्य रसायनतज्ज्ञ व्ही. डी. चव्हाण आणि गोदाम किपर एस. डी. पाटील यांच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या भीतीने संशयितांनी जिल्हा न्यायालयातून तसेच उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा जामीन मंजूर झाला नव्हता. पोलिसांनीही त्यांना अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी गोदामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांना ९, १५, १६ व १७ या चार गोदामात साखरेची पोती आढळून आली. (प्रतिनिधी) कारखान्याचा खुलासा... तरीही तपास कारखान्यातील साखरेच्या सुरक्षेची जबाबदारी कारखान्यावरच सोपविली जाते. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून ते गोदामात शिरले होते. पाण्यात भिजून साखर खराब होऊ नये म्हणून सील केलेली साखरेची पोती दुसऱ्या गोदामात स्थलांतरित केली आहेत, असे वसंतदादा कारखाना प्रशासनाने सांगितले होते. मात्र तरीही गुन्हा दाखल झाल्याने पोलिस तपास सुरू होता.
‘वसंतदादा’च्या साखरेची मोजणी पूर्ण
By admin | Published: October 02, 2016 1:08 AM