सांगली : केंद्र शासनाने सोन्यासह इतर आभूषणांवर लागू केलेला एक टक्का अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणची दुकाने व खासगी आस्थापना बंद होत्या. दुपारनंतर व्यवहार पुन्हा सुरु झाले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या पाठिंब्यानेच सांगली बंदचे आंदोलन करण्यात आले असून, शासनाने अबकारी कराचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी व्यक्त केले. सर्वपक्षीय बैठकीत सोमवारी सांगली व कुपवाड शहरात बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुवर्णकारांवर लादलेल्या अबकारी करामुळे व्यवसायास अडचणी येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वजण यात सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर पहिला दिवस असल्याने आज शहरात ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी व इतर कामासाठी नागरिक आले होते. दुकानदारांनीही बंदमध्ये पूर्ण सहभागी न होता एक शटर उघडे ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला होता. शहरातील कापडपेठ, सराफ बाजार, हरभट रोड, मारुती रोड, राजवाडा चौक, पटेल चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात अनेक दुकाने बंद होती. सायंकाळी शहरातील व्यवहार पूर्वपदावर आले होते. रविवारी व सोमवारी सकाळीही सराफ समितीच्यावतीने शहरात फिरत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सर्वपक्षीय प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी झाल्याचा विश्वास सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी महासंघ, सांगली व्यापारी असोसिएशन, व्यापारी एकता असोसिएशन व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला होता. सराफ बाजार येथे झालेल्या आंदोलकांच्या बैठकीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीगोपाल मर्दा आदींनी यावेळी सुवर्णकारांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत अबकारी कर रद्द करण्याची मागणी केली. गेली महिनाभर सुरू असलेल्या सराफांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष : शासनाबद्दल संताप सराफ बाजार येथे झालेल्या आंदोलकांच्या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपली मते मांडत सुवर्णकारांवर सरकारकडून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. पूर्णपणे परदेशातून आयात होणाऱ्या सोन्यातून शासनाला कर मिळत असतानाही केवळ सुवर्णकारांना अडचणीत आणण्यासाठीच अबकारी कर लादला जात असल्याची टीका यावेळी त्यांनी व्यक्त केली. सराफ समितीच्यावतीने सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर पुकारलेल्या सोमवारच्या बंदला मुख्य बाजारपेठेतील सराफ बाजार, कापडपेठ, हरभट रस्ता, मारुती रस्ता आदी ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला, तर शहरातील विस्तारित भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुपवाडमध्ये संमिश्र कुपवाड शहरात सोमवारी सराफ व शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल कवठेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार, अमोल कदम, सराफ व्यापारी सीताराम लवटे, बाबासाहेब सुर्वे, सूरज पवार, समित कदम आदी उपस्थित होते.
सराफांच्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: April 05, 2016 12:46 AM