दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेशासह इतर राज्यांत कोविड साथ मोठ्या प्रमाणात असून या राज्यांत जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रवाशांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र आवश्यक आहे. राज्यातही कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने परराज्यांतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरजेतून दररोज गोवा, दिल्ली, बेंगलोरसह अन्य राज्यांतून येणाऱ्या व जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून परराज्यांतून प्रवासी येतात. कोविड साथीदरम्यान सध्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने महालक्ष्मी, सह्याद्री, नागपूर एक्स्प्रेस जूनअखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, परराज्यांतून एक्स्प्रेस सुरू आहेत. मिरजेत येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्धारात वैद्यकीय तपासणी करण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने आरोग्य विभागाचे डाॅक्टर व वैद्यकीय पथक प्रवाशांचे तपमान, ऑक्सिजन पातळी तपासणी व कोविडची लक्षणे नसल्याची खात्री करतात. मात्र, आता परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना येताना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक केले असून प्रमाणपत्राशिवाय येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्यात येणार आहे. मिरजेत येणाऱ्या-जाणाऱ्या मोजक्याच एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांना आता वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येणार आहे.
चाैकट
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
मिरजेतून जाणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी करून त्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात येत आहे. तपासणीत कोणतीही लक्षणे आढळल्यास प्रवाशाची रॅपिड टेस्ट करून पाॅझिटिव्ह आढळल्यास उपचारासाठी कोविड रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. कोविड संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. केवळ आरक्षित तिकिटावरच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.