सांगली : भाजपच्या सांगलीतील उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ पक्षाच्या यादीने संपुष्टात आला आहे. भाजपच्या उमेदवारीचे घोडे गंगेत न्हात असतानाच काँग्रेसच्या उमेदवारीचे घोंगडे मात्र भिजत पडले आहे. पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील या दोन्ही इच्छुकांपैकी उमेदवारी कोणाला द्यायची, याचे कोडे सोडविण्यात काँग्रेसला अद्याप यश आले नाही. दरम्यान सांगलीच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत.सांगली विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणूक पृथ्वीराज पाटील यांनी लढविली होती. त्यामुळे यंदाही त्यांनी दावेदारी केली. मागील निवडणुकीत फार स्पर्धा नव्हती. यंदा जयश्रीताई पाटील यांनी दावेदारी करीत बंडखोरीचा इशाराही दिल्याने पक्षापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. स्थानिक नेत्यांना हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले. इच्छुकांसह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या मुंबई व दिल्ली वाऱ्या झाल्यानंतरही उमेदवारीचा प्रश्न कायम आहे.
भाजपने रविवारी सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण, हा प्रश्न सुटलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटणार कधी, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
स्थानिक नेत्यांच्या अडचणी वाढल्या..काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम या दोन्ही नेत्यांनी सांगलीच्या उमेदवारीवर अनेकदा चर्चा केली. दोन्ही नेत्यांपैकी एकाने माघार घेतल्यास त्यांना अन्य संस्थांवर आणि विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफरही दिली गेली. पण ऑफरऐवजी तिकिटासाठी दोन्ही इच्छुक आग्रही राहिल्याने नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
निर्णय घेणार कोण?पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विशाल पाटील व विश्वजीत कदम यांनाच हा प्रश्न सोडवून एक नाव कळविण्यास सांगितल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत उमेदवारीचा प्रश्न सुटला नसल्याने त्याचा अहवाल प्रदेशच्या नेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीतील उमेदवारीचा तिढा नेमका सोडविणार तरी कोण, यावरूनही संभ्रम आहे.
काँग्रेस, भाजपला बंडखोरीची चिंताकाँग्रेसने उमेदवारीचा निर्णय घेताना बंडखोरी किंवा अंतर्गत नाराजीची चिंताही सतावत आहे. त्यामुळे पक्षाने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे भाजपने गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्या पक्षातूनही बंडखोरीचा इशारा दिला जात आहे.