सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
पाटील यांनी गुरुवारी मुंबईत वडेट्टीवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी वडेट्टीवार यांनी याप्रश्नी लवकरच बैठक आयोजित करावी, असे आदेश आपत्ती व्यवस्थापनाच्या उपसचिवांना दिले.
पाटील यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे गेले दोन-अडीच महिन्यांमध्ये छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. टेलरिंग, सलून, लॉंड्री, कापड, भांडी, कटलरी, स्टेशनरी, पुस्तके, इलेक्ट्रिक, हार्डवेअर, हॉटेल, रेस्टॉरंट व अन्य दुकानांचे नुकसान झाले आहे.
सततच्या टाळेबंदीमुळे व्यापारीवर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे, अशा परिस्थितीतही सांगलीतील व्यापारी बांधवांनी संयम ठेवत प्रशासनास सहकार्य केले आहे. त्यामुळे इथे रुग्णसंख्या अत्यंत नियंत्रणात आहे, आता त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवरील व्यावसायिक घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय नोंदणी फी यात या काळापुरती सूट द्यावी, जागेच्या भाड्यामध्ये सूट मिळावी, राज्य व केंद्राच्या करांमध्येही सवलत द्यावी, व्यापाऱ्यांच्या कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज आणि दंड माफ करण्याविषयी बँकांना निर्देश द्यावेत, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढवावी, सुलभ पद्धतीने कर्ज वितरण करण्याचे आदेश व्हावेत, कोरोना काळातील वीज बिल भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळावी, राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यासाठी व्यापारी, व्यावसायिकांच्या, संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.