लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिकेतील सभागृहात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे तैलचित्र लावावे आणि काळा मारुती चौकातील व्यापारी संकुलास वनश्री नानासाहेब महाडिक व्यापारी संकुल असे नामकरण करावे, या मागणीसाठी सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेल्या चंद्रशेखर तांदळे यांनी पालिकेचे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा निषेध करत तृतीयपंथीय यांच्याहस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित केले.
तांदळे यांनी २० मार्चपासून पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणाचा मांडव टाकला होता. पहिल्या तीन दिवसांत उपोषणाची दखल घेतली नाही. त्यांची प्रकृती खालावत जात असल्याचे दिसल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तांदळे यांनी उपोषण सुुरूच ठेवले. गुुरुवारी त्यांनी पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा निषेध म्हणून सोनाली जाधव, गीता पाटील, नेहा मोमीन आणि ऋतुजा शेंडगे या तृतीयपंथीयांच्या हस्ते सरबत घेऊन उपोेषण स्थगित केले.
यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, पृथ्वीराज तांदळे, महेश चौगुले उपस्थित होते.