संख : पीक कर्ज वाटपासाठी सोसायटीवर घातलेली ५० टक्के वसुलीची अट शिथिल करावी, यासह विविध मागण्या बेळोंडगी (ता. जत) येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
त्यात म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी विकास सोसायट्या अडचणीमध्ये येत आहेत. मार्च अखेरपर्यंत सोसायटीकडून येणे असलेले व्याज वसूल झाल्यावर सोसायटी बंद पडली, तरीसुद्धा बँक विचार करायला तयार नाही. विकास सोसायटी आर्थिक कणा आहे. शेतकऱ्यांना शासन धोरणानुसार कमी व्याजदरात कर्ज देतात. मात्र, वसुलीची अट लावून कर्ज देता येत नाही. थकबाकीदार सभासदांना कर्ज देताना २० टक्के कपात करून कर्ज वाटप करावे, असा आदेश आहे. थकबाकी वसूल करा, असे म्हणतात. मात्र, वसुलीनंतर २० टक्के मुदलात कपात करून कर्ज वाटप केले जाते. कपात भरायला शेतकऱ्याकडे तेवढे पैसे नसतात. त्यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे. शासनाने दोन लाखांपर्यंतच्या कर्जाला माफी दिली व नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. ती रक्कम अजूनसुद्धा दिली नाही. त्यामुळे नियमित कर्जदार कर्ज भरायला तयार नाहीत. यामुळे सोसायटीची वसुली टक्केवारी कमी झाली आहे. पीक कर्ज वाटपासाठी सोसायटीवर घातलेली ५० टक्के वसुलीची अट शिथिल करावी.