इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथील तलवार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे. महिलेच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. तर अन्य एका जखमीची प्रकृती स्थिर आहे.
बुधवारी सकाळी पांडुरंग सासणे (वय ६०) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी (वय ५५) यांच्यात सुनेला आणण्याच्या कारणातून वाद झाला. या वादाच्या रागात पांडुरंग सासणे याने पत्नीच्या डोक्यात आणि हातावर तलवारीचे वार केले. डोक्यातील वार खोलवर झाल्याने ती गंभीर जखमी झाली. याचवेळी सासणे याच्या घरासमोरून निघालेले वसंत बाबूराव पवार (वय ५५) हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता पांडुरंग याने त्यांच्यावरही तलवारीने हल्ला चढवत डोक्यात आणि हातावर वार केले. या घटनेनंतर पांडुरंग सासणे याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गंभीर जखमी अवस्थेतील लक्ष्मी पांडुरंग सासणे आणि वसंत बाबूराव पवार याला कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरक्तस्राव झाल्याने दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. उपचारानंतर वसंत पवार यांची प्रकृती गुरुवारी स्थिर होती. तर लक्ष्मी सासणे यांच्या डोक्यात खोलवर वार झाल्याने त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.