लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांना हौसाताई भगवानराव पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात गुरुवारी सायंकाळी कऱ्हाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अस्थिकलश हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे आणण्यात येणार असून, रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता हणमंतवडिये येथे शोकसभा होणार आहे.
दरम्यान, त्यांच्या मृत्युपश्चात होणाऱ्या सर्व धार्मिक विधींना फाटा देऊन त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता अस्थी ठेवून त्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्या लढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले. ते आज सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यांनी नेहमीच अनिष्ट प्रथांना झुगारले. त्यांचे सर्व जीवन शोषण विरहित समाजनिर्मितीसाठी व कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेले. त्यांनी अनिष्ट प्रथांना कधीच थारा दिला नाही. हणमंतवडिये येथे रविवारी त्यांचा अस्थिकलश येत असून, त्या दिवशीच सकाळी ११ वाजता शोकसभेचे आयोजन केले आहे. त्यांच्या पवित्र अस्थी पाण्यात विसर्जित केल्या जाणार नाही. त्यांच्या स्मृती व आठवणींना उजाळा देण्यासाठी अस्थी ठेवून त्या जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
ते झाड क्रांतिवीरांना श्रीमती हौसाताई पाटील यांची आठवण म्हणून जतन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या निधनानंतर होणारे दशक्रिया, उत्तरकार्य यासह अन्य कोणतेही धार्मिक विधी होणार नसल्याचे त्यांचे पुत्र ॲड. सुभाष पाटील व प्रा. विलास पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी सांगितले.