अशोक डोंबाळेसांगली : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगलीत महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दि. २ ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनास उच्च तंत्रशिक्षण मंत्री, शिक्षणमंत्री व पाचही जिल्ह्यांतील आमदारांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.अधिवेशनाच्या तयारीसाठी सांगलीमध्ये बुधवारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रावसाहेब पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, कामगार मंत्री सुरेश खाडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनाही अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे. अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात सुवर्ण शिक्षण साधना ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. अधिवेशन कामकाजासाठी विविध समित्या स्थापन करण्याबाबत निर्णय झाला.यावेळी अशोकराव थोरात, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील, शिवाजी माळकर, एस. टी. सुकरे, प्रशांत चव्हाण, संजय यादव, हरिदास शिंदे, एन. जे. पाटील, प्राचार्य एस. के. पाटील, प्रा. शिवपुत्र आरबोळे आदी उपस्थित होते.
या प्रश्नावर होणार चर्चा
- पूर्वी प्रमाण शिक्षक भरतीचे अधिकार शिक्षण संस्था चालकांनाच मिळावेत.
- शिक्षकेतर, शिक्षकांची १०० टक्के रिक्त पदे भरावेत.
- वेतनेतर अनुदान १२ टक्केपर्यंत द्यावे.
- आरटीई कायद्यामध्ये शासकीय शाळांसाठी असूनही त्याचा खासगी शाळांवर लादला आहे. खासगी शाळांना आरटीई ॲक्टमधून वगळावे.
- पवित्र पोर्ट योजना फेल गेल्यामुळे एमपीएसीमार्फत शिक्षक भरती नकोच.
कोल्हापूर विभागीय उपाध्यक्षपदी भोसलेअधिवेशन कामकाज सोयीसाठी शिक्षण संस्था महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळावर उपाध्यक्ष म्हणून संजीवनी नाॅलेज सिटी पन्हाळा संस्थेचे एन. आर. भोसले, कोषाध्यक्ष म्हणून महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, संघटक म्हणून जिल्हा संघाचे मुख्य प्रवक्ता विनोद पाटोळे, विभागीय संचालक म्हणून प्रा. एम. एस. रजपूत व कोल्हापूरचे बोराडे यांची निवड केली.