सांगली : कोरोनाच्या महामारीत महापालिकेच्या आरोग्य केंद्रांनी मोठी कामगिरी बजाविली असताना संजयनगर येथील आरोग्य केंद्र मात्र जागेच्या वादात सात वर्षांपासून रखडले होते. सोमवारी जागेचा तिढा सोडवत महापौरांनी या वादावर पडदा टाकला.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत २०१४ मध्ये महापालिकेला दहा आरोग्य केंद्रे व एक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले होते. त्यापैकी नऊ आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण होऊन ही केंद्रे सुरू झाली. सध्या कोरोनाच्या काळात या आरोग्य केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली. नागरिकांच्या कोविड चाचण्या, लसीकरणाची सर्व जबाबदारी या केंद्रांनी पार पाडली आहे; पण संजयनगर येथील आरोग्य केंद्राचे काम रखडले होते. महापालिकेने निश्चित केलेल्या जागेबाबत न्यायालयीन दावा दाखल झाला. त्यानंतर सात वर्षे जागा निश्चित करण्यात गेली.
अखेर सोमवारी महापालिका सभेत संजयनगर येथील दोनपैकी एका जागेची निश्चिती करण्याचा विषय अजेंड्यावर होता. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी एक जागा शंभरफुटी रस्त्याकडेला असून नजीकच दोन झोपडपट्ट्या आहेत, संजयनगर परिसरातील नागरिकांना ही जागा सोयीची आहे, त्यामुळे याच जागेवर आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी केली. त्याला संजय मेंढे, कांचन कांबळे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनीही समर्थन दिले.
संतोष पाटील यांनी मात्र त्याला विरोध करीत दुसऱ्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा आग्रह धरला. अखेर महापौरांनी मनोज सरगर यांनी सांगितलेल्या जागेवर आरोग्य केंद्र उभारणीवर शिक्कामोर्तब केले.
चौकट
दिव्यांग कल्याण निधीतून महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना लग्नकार्यासाठी ५० हजार आणि घरकुल बांधण्यासाठी एक लाख रुपये अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.