सांगली : मार्केट यार्डातील बेदाणा व्यापाऱ्याचे राजस्थानमधील व्यापाऱ्याने ६१ लाख रुपये थकविले आहेत. या दोन्ही व्यापाऱ्यांचे भांडण सांगली बाजार समितीच्या सचिवांसमोर शुक्रवारी झाले. बेदाणा असोसिएशनचे काही पदाधिकारीही होते. दोन तासांच्या बैठकीमध्ये दोन व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी चालू होती. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकारही झाले. बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी मध्यस्ती करून दोन व्यापाऱ्यांना शांत केले. पुन्हा सोमवारी बैठक घेण्याचा निर्णय झाला.मार्केट यार्डातील एका बेदाणा व्यापाऱ्याने शेतकरी आणि अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे तो गायब झाला होता, अशी चर्चा रंगली होती. शेतकरी, अडत्यांनी बाजार समितीकडेही तक्रार केली होती. काही दिवसानंतर संबंधित व्यापाऱ्याने शेतकरी आणि अडत्याचे थकीत पैसे दिले आहेत, असा दावा व्यापाऱ्याने बाजार समिती सचिव चव्हाण यांच्याकडे केला आहे. मी सर्वांचे पैसे दिले असून, माझे राजस्थानाच्या व्यापाऱ्याने ६१ लाख रुपये दिले नाहीत, तो प्रश्न सोडविण्याची मागणी केली.त्यानुसार सचिव चव्हाण, बेदाणा असोसिएशनचे पदाधिकारी, संबंधित बेदाणा व्यापारी आणि राजस्थानचा व्यापारी अशी बैठक शुक्रवारी बाजार समितीत झाली. या बैठकीत देण्याघेण्याच्या रक्कमावरुन दोन बेदाणा व्यापाऱ्यांमध्येच जोरदार कलगीतुरा रंगला. या वादावरून सचिव चव्हाण चांगलेच भडकले. तुम्हाला वादच घालायचा असेल तर येथून बाहेर जावा, अशी सूचना केली. त्यानंतर जरा व्यापारी शांत झाले. अखेर दोन्ही व्यापाऱ्यांना सचिव चव्हाण यांनी सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी येण्याची सूचना दिली. धनादेशही घेऊन येण्याची सूचनाही राजस्थानच्या व्यापाऱ्याला त्यांनी सूचना केली.
आमची बदनामी झाली, ती पुन्हा येणार का?बेदाणा व्यापाऱ्यांची पत्नीही बाजार समितीच्या बैठकीला आली होती. यावेळी तुम्ही आम्हाला पैसे वेळेवर दिले नाही. त्यामुळे आमच्याकडून अडते, शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते. यातून आमच्या कुटुंबाला त्रास झाला आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमातूनही बदनामी झाली आहे, ती पुन्हा येणार आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी त्या राजस्थानच्या व्यापाऱ्याला केला.
व्यापारी-हमाल एकमेकांवर धावलेमार्केट यार्डातील गल्ली क्रमांक तीनमध्ये हमाली देण्यावरून व्यापारी आणि हमालांमध्ये प्रथम वादावादी झाली. त्यानंतर दोघातील वाद एवढ्या टोकावर गेला की हमाल व व्यापारी एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. शेजारच्या दुकानातील व्यापारी आणि हमालांनी येऊन वादावर पडदा टाकला. याबद्दल पोलीस अथवा बाजार समितीकडेही तक्रार दिली नाही.