सांगली : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली ऑनलाइन सभा सुरू असतानाच भाजपचे सदस्य सभागृहात शिरुन गोंधळ घातला. तर महिला नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला होता. या गोंधळातच महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी सभा आटोपती घेतली.महापालिकेतील सत्तांतरनंतर पहिलीच सभा महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत गुंठेवारी समितीची स्थापना, प्रभाग समित्यांची पुनर्रचना असे विषय चर्चेला होते. या दोन्ही विषयांना भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. दरम्यान ऑनलाइन सभेत रेंज नसल्याने अडथळे येत आहेत, असे सांगत सभागृहनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह काही नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले.
लिंक का पाठवले नाही, नगरसेवकांचे बोलण्यात येत नाही अशा तक्रारी करत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर ठिय्या मारून बसलेल्या महिला नगरसेविकांनाही सभागृहात आल्या. ऑनलाइन सभा प्रलंबित ठेवून ऑफलाईन घ्यावी अशी मागणी करत भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर महापौरांनी अजेंडावरील विषय मंजूर करत सभा आटोपती घेतली. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांवर पळ काढल्याचा आरोप केला.