म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून कै.केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर गट व सत्ताधारी गटात जोरदार हमरीतुमरी झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने निवड केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
सत्ताधारी गटाकडून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी एकनाथ बागडी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवून जाहिर केले. यावेळी कै. केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर गटाकडून पुष्पराज केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर यांचे नाव सुचविण्यात आले. यावेळी हात वर करून मतदान घ्यावी अशी मागणी कै. केदाररावजी शिंदे-म्हैसाळकर गटाने केली. काही ग्रामस्थांनी पुष्पराज शिंदे यांनाच तंटामुक्तीचे अध्यक्ष करा अशी मागणी करत हात वर करत पाठिंबा दर्शविला.
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची झालेली निवड ही कायद्याला धरून झाली नाही. सरपंचानी आपल्या पदाचा गैरवापर करत हा ठराव घेतला आहे. याबाबत जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिंदे-म्हैसाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामसभेच्या अध्यक्षाच्या अधिकारात त्यांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड केली आहे. मात्र, आपण शासनाचा प्रतिनिधी म्हणून विशेष ग्रामसभा घेऊन ही निवड करण्याबाबत आग्रही असल्याचे ग्रामविकास अधिकारी बी.आर.कुंभार यांनी सांगितले.