भाजपा अन् शिवसेनेच्या उमेदवार यादीत घोळ झाल्याचं दिसून येत आहे. इचलकरंजी मतदारसंघातून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, शिवसेनेनंही आपल्या 70 उमेदवारांची नावासह यादी जाहीर केली. या यादीत दोन्ही पक्षांकडून एकाच मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या यादीत अनुक्रमांक 48 नुसार इचलकरंजी मतदारसंघातून हातकणंगलेचे आमदार सुजित मिनचेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपाच्या यादीत अनुक्रमांक 121, मतदारसंघ क्रमांक 279 मध्ये इचलकरंजीतून सुरेश हळवणकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीतील एकाच मतदारसंघातून दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना संधी कशी काय देण्यात आली? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
हातकणंगलेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुजित मिनचेकर यांना इचलकरंजीतून उमेदवारी घोषित झाली असून भाजपच्या यादीतसुद्धा इचलकरंजीमधून सुरेश हळवनकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं समोर आलंय. याबाबत सुजित मिचनेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ही टायपिंग मिस्टेक असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तसेच, याबाबत मी मातोश्रीवर फोनवरुन कळवल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे इचलकरंजी हा मतदारसंघ भाजपालाच देण्यात आला असून हातकणंगले येथून सुजित मिनचेकर यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपापाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 70 उमेदवारांचा समावेश आहे. तर भाजपाच्या पहिल्या यादीत 125 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामध्ये 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे.