सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेला एक लाख तिरंगा ध्वज पुरविण्यात अपयश आल्याचा मुद्दा भाजपने शुकवारी महासभेत उचलला. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करतानाच त्याच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्वच सदस्यांनी भाजपच्या वक्तव्याला तीव्र विरोध केला. यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आसनासमोरील रिकाम्या जागेत धाव घेत ‘भारत माता की जय’,”वंदे मातरम’,”इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेने एक लाख ध्वज मोफत देण्याची घोषणा केली होती. पण ठेकेदाराने वेळेवर पुरवठा न केल्याने नागरिकापर्यंत ध्वज पोहोचू शकले नाहीत. यावरून भाजपच्या स्वाती शिंदे यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी करताना त्याच्या पक्षाचा उल्लेख केला. यावरून दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी जय शाह यांनी तिरंगा ध्वज हाती घेण्यास नकार दिल्याचे सांगत पक्ष बघून देशप्रेम करता का? जय शाह आणि भाजपचाही निषेध सभेत करायचा का, असा सवाल उपस्थितीत करीत भाजपला कोंडीत पकडले. मेंढे यांच्या प्रतिहल्ल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेली. अखेर भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार यांनी मध्यस्थी करीत वाद शांत केला.