अविनाश कोळी
मिरज : मिरज स्थानकातून बीडला जाण्यासाठी एसटी नसल्याने सुमारे पाचशे प्रवाशांनी शनिवारी रात्री मिरज बसस्थानकात गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बीड, पंढरपूर व सोलापूरला जाण्यासाठी पाच जादा एसटी सोडून सर्व प्रवासी रवाना करण्यात आले.बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व मजूर मोठ्या संख्येने सांगली व मिरज परिसरात कामासाठी आहेत.
सर्वांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावी जायचे असल्याने त्यांनी आठवड्यापूर्वी प्रासंगिक करारावर बीडला जाण्यासाठी एसटीची विचारणा केली होती; मात्र एसटीचे दर जादा असल्याच्या कारणावरुन एसटी बुकिंग केले नाही; मात्र शनिवारी सांगली जिल्ह्यातील कामगार व मजूर बीड जिल्ह्यात जाण्यासाठी मिरज एसटी स्थानकात दुपारपासून दाखल झाले; मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत कोल्हापुरातून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीत जागा मिळत नसल्याने रात्री नऊ नंतर प्रवाशांचा संयम सुटला.
यामुळे बीडला जाणाऱ्या प्रवाशांनी दिसेल त्या एसटीत घुसून बीडला सोडण्याची मागणी सुरू केली. बीड जिल्ह्यासाठी गाडी उपलब्ध करा अन्यथा एसटी बंद करा अशी मागणी करीत अन्य मार्गावरील एसटी गाड्याही अडवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे एसटी आगार प्रशासनाची धावपळ उडाली. पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन अडवलेल्या गाड्या सोडल्या; मात्र बीडला जाणाऱ्या प्रवाशांनी स्थानक भरल्याने स्थानकात गोंधळ उडाला. एसटी गाड्यांची कमतरता व चालक उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन बीडला जादा गाड्या सोडता येणार नसल्याचे आगार प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे प्रवासी आणखी संतप्त झाले. एसटीच्या प्रतीक्षेत रात्री अकरापर्यंत प्रवासी ताटकळत होते. रात्री उशिरा बीड-पंढरपूर व सोलापूरला पाच जादा गाड्या सोडून प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.