अशोक पाटीलइस्लामपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथे दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध नेत्यांनी अभिवादन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाडिक बंधूंशी खलबते केली तर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची अनुपस्थिती जाणवली. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेबद्दल महाडिक गटात उलट-सुलट चर्चा होती.बुधवारी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक आणि भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पेठ येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विविध पक्षांसह वाळवा, शिराळ्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही अभिवादन केले.
गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली होती. त्यांनी पेठनाक्यावर जाऊन महाडिक बंधूंशी खलबते करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते. भाजपबरोबर असणारे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर खोत यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. या दोघांच्या भूमिकेबद्दल महाडिक गटात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
नानासाहेब महाडीक यांना अभिवादन करण्यासाठी पेठ नाक्यावर गेलो होतो. यात कोणतेही राजकारण नाही. फक्त नानासाहेबांच्या जुन्या आठवणीला उजाळा देण्यावर चर्चा झाली. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना