मुली व महिलांना पुरुषांबरोबर समान हक्क असतानाही पुरुषी रूढी-परंपरा अद्याप प्रचलित आहे. मिरजेत विवाहनिमित्त आयोजित केलेल्या गोंधळ व धार्मिक कार्यक्रमात मुलीस डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांच्या भावाच्या विवाहानिमित्त आयोजित गोंधळ कार्यक्रमासाठी एका गोंधळ्यास पाचारण करण्यात आले होते.
गोंधळ कार्यक्रमात पूजेसाठी नवदांपत्यासह दिवटे म्हणून तीन मुलांसोबत रुईकर यांच्या मुलीस बसविले होते. गोंधळ्याने मुलीस पूजेस बसण्यास आक्षेप घेत मुलींना पूजेचा अधिकार नाही. मुलगा नसलेल्यांचा जन्म व्यर्थ आहे. मुलीस पूजेस बसवून धर्माचे नियम मोडले आहेत, असा पवित्रा घेत गोंधळ विधी करण्यास नकार दिला. नातेवाईकांनी गयावया केल्याने विधी पूर्ण केल्यानंतर गोंधळ्याने धर्मशास्त्राप्रमाणे अग्निसंस्काराचा अधिकार पुरुषाला असताना, तुम्ही मुलीच्या हातात दिवटी दिल्याने हा विधी तुम्हाला लाभणार नाही व देवीचा तुमच्यावर कोप होईल, असा शापही दिला. या कृत्याबाबत तानाजी रुईकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती व शहर पोलिसात गोंधळ्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
चाैकट
तक्रार दखलपात्र नाही
याबाबत पोलिसांशी संपर्क साधाला असता भेदभाव व अंधश्रद्धा पसरविल्याची तक्रार दखलपात्र नसल्याचे सांगण्यात आले. अंधश्रद्धा कायद्याप्रमाणे कारवाई करायची असेल तर गोंधळ घालणे हीसुद्धा अंधश्रद्धाच असल्याचे पोलिसांनी सांगितले.