सांगली : केंद्र सरकारने राफेल या लढाई विमान खरेदीच्या माध्यमातून केलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ््याचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा व शहर कॉँग्रेसच्यावतीने शनिवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. सरकारचा निषेध व्यक्त करतानाच टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले. ‘जवाब दो, हिसाब दो, नही तो खुर्ची खाली करो’, ‘शिमगा आता राफेलचा, निवडणूकपूर्व पैशाचा’, ‘भ्रष्टाचाराचा कळस, राफेल गडप, पैसा हडप’ अशा घोषणा व त्यांचे फलक घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, संरक्षण मंत्रालयात लढाऊ विमान खरेदीतून देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. सामान्य जनतेला याबाबत कोणतीही माहिती देण्यास केंद्र सरकार तयार नाही. ३६ विमानांच्या खरेदीसाठी पडद्याआड झालेला व्यवहार जनतेसमोर आणण्याचा कॉँग्रेसचा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन करीत आहोत.
राफेल विमान खरेदीतून ४१ हजार २०५ कोटी रुपयांची लूट मोदी सरकारने केली आहे. तरीही सुरक्षेचे कारण देऊन माहिती देण्यास हे सरकार टाळाटाळ करीत आहे. सुरक्षेचा आणि निविदा प्रकरणाचा काहीही संबंध नाही, तरीही सरकार केलेल्या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करीत आहे. राफेल या कंपनीविषयीची सर्व माहिती आम्ही उपलब्ध केली आहे.
निविदा प्रक्रियेबाबतही आम्हाला अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळेच आम्ही ठोसपणे त्यांच्यावर आरोप करीत आहोत. या आरोपांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही भाजप नेता अवाक्षरही काढायला तयार नाही. त्यामुळे त्यांना या गोष्टी मान्य असल्याचेच दिसत आहे. त्यांनी याप्रकरणी कागदपत्रांसह खुलासा करावा, अशी आमची मागणी आहे.
मोदी यांनी भ्रष्टाचार थांबविण्याची प्रतिज्ञा देशवासीयांसमोर केली होती. प्रत्यक्षात त्यांच्याच सरकारच्या काळात आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार घडला आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी करूनही त्याचे उत्तर देण्याचे सरकारचे धाडस नाही. कॉंग्रेस सरकारवर त्यांनी केलेला एकही आरोप त्यांना सिद्ध करता आला नाही.
आंदोलनात प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मालन मोहिते, डॉ. राजेंद्र मेथे, राजन पिराळे, अजित ढोले सहभागी झाले होते.रॉकेल नाही, राफेलमध्ये रसगोरगरिबांना रॉकेल देण्यामध्ये यांना रस नाही. रेशनवरील रॉकेल बंद करून घबाड मिळवून देणाऱ्या राफेलमध्ये या सरकारला रस आहे, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
...तर आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करू!आमचे आंदोलन ठोस पुराव्यांवर आधारित आहे. आमचे आरोप खोटे असल्याचे सरकारने कागदोपत्री सिद्ध करावे. लोकांसमोर त्यांनी स्पष्टीकरण दिल्यास आम्ही केलेल्या आरोपांबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.