सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ७ जून रोजी होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालविली असून, यावेळी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष एकाच व्यासपीठावर येणार आहेत.महापालिकेच्यावतीने माळबंगला येथे ७० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकन स्काडा प्रणालीचा वापर केला आहे. २०४० पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती झाली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातील हे काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत दोनदा या प्रकल्पाच्या उद््घाटनाचा मुहूर्त चुकला होता. एकदा पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, तर दुसऱ्यावेळी कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असतानाच महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रात दोन कर्मचाºयांचा बळी गेल्याने उद््घाटन रद्द करण्यात आले.आता पुन्हा काँग्रेसने ७ जून रोजी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. महापालिका प्रशासनाने मात्र सर्वपक्षीय प्रोटोकॉल पाळत निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांनाही स्थान दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले असले तरी, त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते प्रकल्पाचे उद््घाटन होणार आहे. यानिमित्ताने काँग्रेसने शक्तिप्रदर्शनाची तयारी चालविली आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंगही यानिमित्ताने फुंकले जाणार आहे.आघाडीबद्दल : उत्सुकतामहापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उद््घाटनाच्यानिमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष एकत्र येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आघाडीचे संकेत दिले आहेत. पण काँग्रेसकडून अद्याप जाहीरपणे त्यावर प्रतिक्रिया उमटलेली नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आघाडीची घोषणाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद््घाटनाचा प्रयत्न बारगळलाभाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत येणार होते. या प्रकल्पाचे उद््घाटन त्यांच्याहस्ते करण्याचा घाट प्रशासनातील काही अधिकाºयांनी घातला होता. तशी चर्चाही अधिकाºयांत झाल्याचे समजते. पण भाजपची बैठकच रद्द झाल्याने या अधिकाºयांचा प्रयत्न बारगळल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष एकत्र येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:48 PM