सांगली : गव्हाणीत ख्रिस्त जन्मला, बेथेलहेमी ख्रिस्त जन्मला, देवदूत गाती स्तुती त्याला, आपणही स्तुती करूया...असा धर्मसमानतेचा संदेश देत शुक्रवारी सांगलीतील स्टेशन चौकात ख्रिसमसची संध्याकाळ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संग्राम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ख्रिस्ती समाजासह सर्वधर्मियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संग्राम ही संस्था गेल्या २० वर्षांपासून आरोग्य व मानवी हक्क या विषयावर संपूर्ण देशात काम करीत आहे. वेश्या अन्याय मुक्ती परिषद, विद्रोही महिला मंच, मुस्कान संस्था, नजरिया व मित्रा संघटना या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी लढा देत आहे.
संग्रामने विविध धर्मातील व्यक्तींबरोबर काम करीत भेदभाव व कलंक कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदा संस्थेच्यावतीने ख्रिस्ती समाजातील व्यक्तींना सद्भावना दाखविण्यासाठी ख्रिसमसची संध्याकाळ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकाजवळ सायंकाळी हा कार्यक्रम झाला. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांच्या मनात, कृतीत धर्मसमानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
ख्रिसमस ट्रीच्या साक्षीने येशू ख्रिस्तांची महती गाण्यांच्या माध्यमातून सांगण्यात आली. सांगली, मिरज, कोडोली, वानलेसवाडी, बेथेलहेमनगर येथील क्वायर ग्रुपने ख्रिस्तांवरील गाणी सादर केली. ख्रिस्त जन्मला, आज जन्मला, येशू आज जन्मला, आज आया है खुशियों का मौसम..., अशी गाणी सादर करीत ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा करण्यात आला.
संग्राम संस्थेच्या कार्यवाह मीना शेषू यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी संचालक शीतल प्रताप, शशिकांत माने, शांतिलाल काळे, राजू नाईक, चंदा वजने, संगीता मनोजी, किरण देशमुख, माया गुरव, प्रशांत भोसले उपस्थित होते.