सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील अंतर्गत वादाबाबत माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. या वादात पतंगरावांनी दोन्ही गटांना डोस पाजला. पालिकेच्या विविध योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक आयोजित करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पालिकेत मदनभाऊ गटाविरोधात उपमहापौर विजय घाडगे यांच्या नेतृत्वाखालील गट कार्यरत झाला आहे. सध्या महापौर व स्थायी समितीचे सभापती हे मदनभाऊ गटाचे मानले जातात, तर उपमहापौर घाडगे, नगरसेवक शेखर माने यांच्यासह बारा नगरसेवकांचा गट माजी मंत्री प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. महापौर, उपमहापौर निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता. तरीही नेत्यांनी नगरसेवकांना एकसंध ठेवण्यात यश मिळवित, या निवडी पार पाडल्या. पण निवडीनंतरही दोन्ही गटाने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. उपमहापौर घाडगे, नगरसेवक शेखर माने यांनी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यात आयुक्तांनी उपमहापौरांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत वादाला तोंड फोडले. काही दिवसांपूर्वीच या गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, पालिकेच्या विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन दिले होते. महापौर व उपमहापौर गटातील संघर्षाबाबत सोमवारी पतंगराव कदम यांच्याकडे तक्रार करण्यात आली. पतंगरावांनी दोघांही पदाधिकाऱ्यांना उपदेशाचे डोस पाजले. उपमहापौरांना अधिकाऱ्यांची बैठक घ्यायची असेल, तर महापौरांना सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. पालिकेत महापौरांना सर्वाधिकार आहेत. तेच बैठका घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच कारभार करावा, असा डोसही दिला. महापौरांनाही, त्यांनी या गटाला सोबत घेऊन एकसंधपणे काम करण्याची सूचना केली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, अतुल माने, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, अमर निंबाळकर यांच्यासह मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसमधील वाद पतंगरावांच्या दारी!
By admin | Published: March 09, 2016 12:56 AM