लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात सांगली शहर जिल्हा कॉंंग्रेसच्यावतीने शहरासह माधवनगर, नांद्रे आणि बालाजीनगर येथे निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पाटील म्हणाले की, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लादून लाखो, कोटी रुपयांची लूट केली आहेत. सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.
मार्केट यार्ड येथील पेट्रोल पंपावर झालेल्या आंदोलनात नगरसेवक अभिजित भोसले, संतोष पाटील, प्रा. नेमिनाथ बिरनाळे, इलाही बारुदवाले, अल्ताफ पेंढारी, देशभूषण पाटील, अजित ढोले, सिद्धार्थ माने, मौला वंटमुरे, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, भाऊसाहेब पवार, पैगंबर शेख, प्रतीक्षा काळे, अमित पारेकर आदी सहभागी झाले होते.
माधवनगर येथील पेट्रोल पंपावरील आंदोलनात उदय पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश मालानी, अण्णा विचारे, शोभा चव्हाण, शेखर तोरो, दत्ता शिंदे, विलास शिंदे, उत्तम सूर्यवंशी, छाया हत्तीकर, विक्रम कांबळे, दिनकर साळुंखे, फारुख मुजावर, संजय चव्हाण आदी सहभागी झाले होते; तर बालाजीनगर पेट्रोल पंपावर नगरसेवक संतोष पाटील, अल्ताफ पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
चौकट
नांद्रे येथे गांधीगिरी
नांद्रे येथे वाहनचालकांना गुलाबाची फुले देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. किसान काँग्रेस सेल सांगलीचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, विकास सोसायटी चेअरमन महावीर भोरे, नाभिक समाज मिरज तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, डॉ. प्रवीण पाटील, अमित पाचोरे, माजी उपसरपंच सुहास पाटील, माजी उपसरपंच सुनील सकळे, आयुब कागदी, सरदार मुल्ला, रमेश जाधव, बाबासाहेब जाधव, महावीर नरदे सहभागी झाले होते.