सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 12:50 PM2021-12-07T12:50:47+5:302021-12-07T12:52:16+5:30

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

Congress and NCP file nominations in Sangli Municipal Corporation Ward 16 by election | सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

Next

सांगली : महापालिकेच्या प्रभाग १६ मधील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केल्याने महाआघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. विरोधी भाजपकडूनही दोन अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल.

काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी आठ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, इरफान शिकलगार यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक उत्तम साखळकर, फिरोज पठाण, मयूर पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

भाजपकडून अमोल गवळी, बालाजी काटकर यांचे अर्ज दाखल झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, नगरसेविका भारती दिगडे उपस्थित होते.

राष्ट्रवादीतून उमर गवंडी, बादशहा पाथरवट यांचा अर्ज दाखल करताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, आरिफ बावा, ज्योती आदाटे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीकडून याकुब जहाँगीर बागवान, तर अपक्ष अमित नंदकुमार पवार यांचाही अर्ज भरणाऱ्यात समावेश आहे.

काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोधसाठी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. मागील निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढल्या. तरीही पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेने महाआघाडीत फूट पडल्याचे दिसून येते. शिवसेनेनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी अर्ज दाखल केला नाही.

बिनविरोधचा ९ रोजी निर्णय

- भाजपच्या प्रदेश नेत्यांनी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. बिनविरोधचा निर्णयही प्रदेशस्तरावरून होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.

- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्ज भरण्याची सूचना केल्याने उमेदवार दिले आहेत. माघारीचा निर्णय जयंतरावच घेतील, असे महापौर सूर्यवंशींनी स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Congress and NCP file nominations in Sangli Municipal Corporation Ward 16 by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.