सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 04:20 PM2023-07-01T16:20:42+5:302023-07-01T16:21:15+5:30

राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांध

Congress, BJP are preparing for the Lok Sabha and Assembly elections In Sangli | सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

googlenewsNext

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील रंग बदलत आहेत. काँग्रेसमधील युवा नेत्यांनी एकीचा निर्धार करीत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. दुसरीकडे विरोधी भाजपमध्ये गटबाजीचा अध्याय छुप्या पद्धतीने लिहिला जात आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी व ठाकरे गटातील पक्षांतर्गत वातावरणही फारसे चांगले नाही.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत मोठा मेळावा घेऊन काँग्रेसने रणशिंग फुंकल्याने पक्षांतर्गत वातावरण बदलले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील यांच्या पश्चात कार्यकर्ते खचले होते. या प्रमुख नेत्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशी काँग्रेस नेत्यांची युवा फळी आता निवडणुकांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सरसावली आहे. या सर्वांनी एकीची मूठ आवळल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या यशामुळेही सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे.

जिल्हा व तालुकास्तरावर पक्षीय निवडणूक प्रमुख नियुक्त करुन काँग्रेसच्या अगोदरच भाजपने लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला, मात्र पक्षांत गटबजीचे वारे वाहू लागले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे राजकीय वैर जिल्ह्याला माहीत आहे. याशिवाय भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेसने उघडपणे एकसंधतेचा नारा दिला. पक्षांतर्गत वातावरणही त्याप्रमाणे बदलवले जात आहे. तसा नारा भाजप नेत्यांना देता आला नाही किंवा पक्षातील वातावरण बदलता आलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची वाट सध्या बिकट असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांध

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व पक्षात एकसंधपणा टिकविण्यासाठी कारणीभूत ठरत असले तरी महापालिका क्षेत्रात या गोष्टीचा प्रभाव दिसत नाही. महापालिका क्षेत्रातील नेत्यांमध्ये मोठी गटबाजी दिसून येते. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना बसू शकतो.

ठाकरे गटासमोर अस्तित्वाची लढाई

शिवसेनेच्या ठाकरे गटाला जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची त्यांना साथ मिळणार असली तरी पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

Web Title: Congress, BJP are preparing for the Lok Sabha and Assembly elections In Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.