सांगली : शहरातील नाल्याच्या बांधकामासाठी दहा कोटींच्या निधीवरून स्थायी समिती सभेत काँग्रेस व भाजपचे सदस्य भिडले. एकमेकांना बघून घेण्याची धमकी देत एकेरीवरही आले. अखेर सभापती पांडुरंग कोरे यांनी मध्यस्थी करत सदस्यांतील वादावर पडदा टाकला.
चैत्रबन ते आरवाडे पार्क या नाल्याच्या बांधकामासाठी वित्त आयोगातून दहा कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या कामाची निविदा मागविण्याचा विषय स्थायी समितीच्या अजेंड्यावर होता. यावेळी भाजपचे संजय यमगर व काँग्रेसचे प्रकाश मुळके यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. यमगर यांनी हा निधी महापालिकेचा असून तो एकाच वाॅर्डातील नाल्यावर खर्च करण्यास विरोध केला. त्याला मुळके यांनी हरकत घेतली. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
त्यावर यमगर यांनी मुळके यांना प्रत्युत्तर देताना वाद वाढत गेला. या निधीबाबत संतोष पाटील यांनी स्थायी समिती बरखास्त करण्याची धमकी दिली होती तसेच आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी शासनाकडून काम मंजूर करून आणल्याचे सांगत आहेत पण हा निधी महापालिकेचा आहे. तो खर्च करण्याचा अधिकारही पालिकेला आहे. त्यांनी निधी मंजूर करून आणला म्हणजे उपकार केले नाहीत, असा टोला लगाविला. त्यावर मुळके यांनी ‘उपकार’ या शब्दाला आक्षेप घेतला. त्यातून दोघेही हमरीतुमरीवर आले. एकेरी भाषेचा वापर करण्यात आला. एकमेकांना बघून घेण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. अखेर सभापती कोरे यांनी हस्तक्षेप करत दोघांतील वाद मिटविला.